विविध पूजा / विधी

मंगळागौर

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिन्यात करण्याची अनेक व्रते आहेत. स्त्रियांनी करण्याच्या व्रतांपैकी अत्यंत महत्वाचे असे एक व्रत म्हणजे मंगळागौरीचे व्रत. श्रावण महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी करण्याचे हे व्रत आहे.

विवाहानंतर येणा-या पहिल्या श्रावण महिन्यातील एका मंगळवारी आपल्याला अखंडित सौभाग्य, धन-धान्य, पुत्र-पौत्र इत्यादि प्राप्त व्हावे व पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे ह्या उद्देशाने संकल्पपूर्वक शिव-मंगलागौरीचे पूजन करतात.

सर्वप्रथम गणपतिपूजन, कलश-घंटा-दीप पूजन करुन मंगळागौर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिव-मंगलागौरीचे आवाहन करुन षोडशोपचारे पूजा करतात. काही ठिकाणी देवीला कणकेचे अलंकार वहाण्याची पद्धत आहे. नंतर देवीची अंगपूजा करुन देवीला विविध पत्री (झाडांची पाने) , फुले वहातात. नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ इ. धान्ये मूठीने वहातात. धूप-दीप-नैवेद्य अर्पण करुन षोडशोपचार पूजा झाल्यावर सर्व प्रकारच्या संपत्ती प्राप्ती, दीर्घायुष्य, अखंड सौभाग्य प्राप्ती व सर्व मनोकामना पूर्ण होण्याकरिता देवीला तीन अर्घ्य दिली जातात. नंतर पूजा सांगणा-या पुरोहिताची गंधाक्षता-पुष्प, विडा दक्षिणा देऊन पूजा करावी.

ह्या नंतर इतर फुले व पत्रींनी पूजा सजवून मंगळागौरीची कहाणी वाचावी. देवीला विविध पक्क्वान्नांनी युक्त महानैवेद्य अर्पण करुन कणकेच्या सोळा दिव्यांनी व काडवातींनी आरती करावी. ब्राह्मण, सुवासिनी व आप्तेष्टांसमवेत भोजन करावे. (व्रत करणा-या सुवासिनीने मात्र न बोलता जेवावे अशी काहीशी गमतीदार रुढी आहे. )

संध्याकाळी पुन्हा देवीची आरती करुन देवीसमोर पारंपारिक खेळ खेळून जागरण करावे. आजकाल हे पारंपारिक खेळ खेळण्याकरिता काही महिला मंडळेही बोलावली जातात.

मंगळागौरीचे उद्यापन

अशा रितीने पाच वर्षे हे व्रत करावे व पाचव्या वर्षी उद्यापन करावे. उद्यापनाच्या वेळी सर्व पूजा करुन पुण्याहवाचन करावे. व्रत करणा-या सुवासिनीने आपल्या आईला यथाशक्ती वस्त्रालंकार देऊन ओटी भरावी व लाडवाचे वायन द्यावे.

या पूजेसाठी लागणा-या सर्वसाधारण साहित्याची यादी. (पूजेपूर्वी मुहुर्त व यादीबद्दल गुरुजींचा सल्ला घ्यावा)

हळद, कुंकु, गुलाल, बुक्का

मध

वस्त्र (ब्लाऊजपीस)१

चौरंग

रांगोळी

अत्तर

कापसाची वस्त्रे

पाट किंवा आसने ३

नारळ २

जानवीजोड

कणकेचे दिवे १६

समई , निरंजन

सुपा-या १५

कापूर

कणकेचे अलंकार

पळी भांडे

हळकुंडे ५

उदबत्ती

हार, सुट्टी फुले, गजरे

तांब्या (कलश) २

बदाम ५

तांदूळ १/२ कि.

बेल, दुर्वा, तुळस, पत्री

ताम्हण २

खारका ५

जिरे, मुगाची डाळ, पांढरे तीळ

विड्याची पाने २५

स्टील ताटे / ट्रे २

दिव्यासाठी तेल,तुप

गूळ खोबरे

केळी६, फळे ५

वाट्या ८

काडवाती , फुलवाती

खडीसाखर

मंगळागौर / अन्नपूर्णा

शंख,घंटा

तेलवाती

पेढे

काड्यापेटी

सुट्टे पैसे २० नाणी

पंचामृत ( दही, दूध, तूप, साखर, मध )

हात पुसण्यासाठी व देव पुसण्यासाठी वस्त्र किंवा नॅपकिन २

इतर सुवासिनींसाठी आवश्यक असल्यास तयारी करावी

मंगळागौर पुजेची माहिती डाऊनलोड करा