संस्कृती आणि विद्येचे माहेरघर म्हणून जगविख्यात असणा-या पुणे शहरापासून साधारणपणे ८ कि.मी. अंतरावर असणा-या व श्री सोमेश्वर, श्री वाकेश्वर इ. देवस्थाने जिच्या तीरावर आहेत अशा ऐतिहासिक महत्व असणा-या रामनदीच्या
तीरावर वसलेले पाषाण हे गाव, जे आता पुण्याचे एक उपनगर म्हणून नावारुपाला येत आहे. ह्याच गावातील पेशवेकाळापासून पाषाण, बावधन, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी ह्या पंचक्रोशीचे ग्रामजोशी (ग्रामपुरोहित) म्हणून मान्यता पावलेले असे एक कुटुंब म्हणजे ढेरे कुटुंब.
पेशवेकाळापासूनचा हा पौरोहित्याचा वारसा चालू ठेवला आहे आत्ताच्या पिढीतील श्री. प्रभाकर श्रीधर ढेरे यांनी. २९ जानेवारी १९६१ रोजी जन्मलेल्या श्री. प्रभाकर ढेरे यांनी मॉडर्न कॉलेज, गणेशखिंड येथे लौकिक शिक्षण घेत असतानाच तीर्थरुप श्रीधर शंकर ढेरे ह्यांच्याकडून
मौखिक परंपरेने वेदविद्या व ज्योतिषशास्त्र यांतील ज्ञान आत्मसात केले. हे ज्ञान फक्त धार्मिक कर्मकांडांपुरतेच मर्यादित न ठेवता, समाजातील सर्व स्तरातील लोकांना वेळोवेळी, योग्य ते व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करुन जनमानसात एक श्रद्धेचे स्थान निर्माण केले आहे.
ही परंपरा पुढे चालविली आहे, कै. दामोदर शंकर ढेरे यांचे नातू श्री. सुमीत गजानन ढेरे यांनी.
७ मे १९८२ रोजी जन्म झालेल्या श्री. सुमीत ढेरे यांनी आपले प्राथमिक शिक्षण कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळेच्या पुणे विद्यापीठ शाखेतून तर माध्यमिक शिक्षण मॉडर्न हायस्कूल, जंगली महाराज रोड, पुणे येथून पूर्ण केले.
त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) औंध येथून घड्याळ दुरुस्तीचा डिप्लोमा पूर्ण करुन वडिलांचा घड्याळदुरुस्तीचा व्यवसाय चालविण्याचा प्रयत्न केला. परंतु शालेय जीवनापासूनच पौरोहित्य व संस्कृत विषयाची गोडी असल्याने पौरोहित्याचे
शिक्षण घेण्यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वेदपाठशाळेत प्रवेश घेतला. वेदमूर्ती श्री. करंबेळकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली वेदाध्ययन करत असतानाच आजोबा श्रीधर शंकर ढेरे यांचे निधन झाले. त्यामुळे वेदपाठशाळा सोडून काका श्री. प्रभाकर श्रीधर ढेरे यांच्या
हाताखाली प्रत्यक्ष पौरोहित्य करत प्रात्यक्षिक शिक्षण सुरु केले. ह्या सर्व प्रवासात ढेरे कुटुंबाचे कुलोपाध्याय वेदशास्त्रसंपन्न मा. श्री. नारायणराव गो. कानडे व वेदमूर्ती श्रीराम ना. कानडे यांचे आशिर्वाद व प्रत्यक्ष मार्गदर्शन पाठीशी होते व आजही आहे.
पौरोहित्य करत असतानाच इ.स. २००६ साली पुणे विद्यापीठातील संस्कृत विभागातून Higher Diploma in Sanskrit पूर्ण केला. तसेच समाजातील वास्तुशास्त्र विषयक गैरसमज व योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता ओळखून पुण्यातील इन्स्टिट्यूट
ऑफ ओरिएंटल सायन्सेस या संस्थेतून प्रख्यात ज्योतिषशास्त्रज्ञ व वास्तुशास्त्रतज्ञ डॉ. धुंडिराज पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचीन भारतीय वास्तुशास्त्राचा अभ्यास सुरु केला व ऑगस्ट २००८ मध्ये ‘वास्तुभूषण’ ही पदवी मिळविली. डिसेंबर २००९ मध्ये डॉ. नरेंद्र
सहस्त्रबुद्धे यांच्या मूनस्टार फाउंडेशन या संस्थेतर्फे आयोजित वास्तुशास्त्र अभ्यासवर्गातून सुद्धा ‘वास्तुभूषण’ ही पदवी प्राप्त केली. आता प्रत्यक्ष वास्तु मार्गदर्शन करत असतानाच अनेक समाधानी यजमानांच्या अनुभवातून पुढील शिक्षण चालू आहे.
© Copyright 2017 | All Rights Reserved | Powered by COSMIC