आपल्या वैदिक हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी दहावा संस्कार म्हणजे उपनयन. संस्कार म्हणजे जन्मजात असणारे विकार (दुर्गुण) दूर करुन अधिक सुदृढ व निर्दोष व्यक्तीमत्व घडविण्यासाठी केलेला प्रयत्नपूर्वक विधी. प्रत्येक व्यक्तीचे जीवन आरोग्यपूर्ण, सुसंस्कृत, विकसीत व्हावे व त्याद्वारे उत्तम, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कारीत व्यक्तीमत्व निर्माण व्हावे. त्यापासून चांगल्या समाजरचनेची पायाभरणी व्हावी व त्यायोगे एक चांगले व सुसंस्कृत, बलशाली राष्ट्र निर्माण व्हावे हा या संस्कारां मागील प्रमुख उद्देश आहे.
सर्वसाधारणपणे ५ व्या वर्षापासून ८व्या वर्षापर्यंतचा कालावधी उपनयन संस्कारासाठी योग्य मानला जातो. कारण कोवळ्या मनात संस्काराने स्मृती तयार होते व कायम टिकून रहाते. यानंतरचा १२ ते १६ वर्षांचा काळ हा अध्ययनाचा. म्हणून अध्ययनाचा श्रीगणेशा करण्याचा संस्कार म्हणजेच
मुंज, व्रतबंध,उपनयन अथवा मौंजीबंधन !
उपनयन’चा शब्दशः अर्थ आहे जवळ जाणे. विद्यार्जनासाठी घरापासून दूर गुरुंच्या जवळ जाणे.
गुरुगृही जाणारा बटू सुसंस्कारित असावा यासाठी हा विधी केला जातो.
१) चौलकर्म : बटूचे केस कापून घेरा आणि शेंडी ठेवणे म्हणजे ‘चौलकर्म’. केसाच्या मुळाशी असलेले दोष जावेत व डोक्याच्या मध्यभागी असलेल्या बुद्धीचे रक्षण व्हावे, मेधा शाबूत रहावी यासाठी घेरा आणि शेंडीचे प्रयोजन.
यानंतर अभ्यंगस्नान करुन सोवळं-उपरणे या बटूवेशात मुंज मुलगा तयार होतो मातृभोजनासाठी ..
२) मातृभोजन :येई बाळा लवकरी माय पाहे वाट । मातृभोजनाचा केला बघ किती थाट ॥ व्रतबंध संस्कारात मातृभोजनाला विशेष महत्त्व आहे. आज आईच्या पानात , आईच्या हातून शेवटचं जेवायचं. यानंतर ज्ञानप्राप्तीसाठी तयार झालेल्या बटूला अनेक नियम पाळावे लागतात. सर्वात पहिला नियम ‘ उष्ट अन्न वर्ज्य ’ उष्ट्या अन्नामुळे बुद्धी भ्रष्ट होते, म्हणून बटूने शुद्ध, सात्विक अन्न घ्यावे, परान्न टाळावे (आजच्या काळात ‘ जंक फूड’ टाळावे) हा यामागचा हेतू.
३) मंगलाष्टक : देव-देवतांच्या स्तुतीपर श्लोक व आशिर्वचनपर काव्यगायन म्हणजे ‘ मंगलाष्टके ’. तसेच सर्वांचे मंत्राक्षतायुक्त आशिर्वाद बटूला दिले जातात.
४) प्रायश्चित्त होम : गर्भादानापासून चौलकर्मापर्यंतचे पहिले नऊ संस्कारांपैकी काही संस्कार जर काही कारणाने राहिले असतील तर त्याबद्दल होमहवनपूर्वक प्रायश्चित्त घेऊन मग उपनयन हा दहावा संस्कार करायचा असतो.
५) उपनयन होम :उपनयन संस्कारातील हा विशेष महत्त्वाचा विधी. यामध्ये बटूला सूर्य आणि पवमान आदि देवतांचे आशिर्वाद मिळावेत यासाठी अग्नीमध्ये आहुती दिल्या जातात. मृगाजीन, यज्ञोपवीत व पलाशदंड देऊन बटूचे मौंजीबंधन केले जाते. यज्ञोपवीत हे आपल्या वैदिक जीवनधारणेचे प्रतीक आहे. यज्ञोपवीतामध्ये ९ तंतू असतात. त्यांमध्ये अनुक्रमे ॐकार, अग्नी , नाग, सोम, पितर, प्रजापती, वायू, यम आणि विश्वेदेव यांची स्थापना केली जाते. या नऊ तंतूंची तीन-तीनची त्रिसूत्री केली जाते. त्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद यांची स्थापना करतात. या सर्वांची मिळून एकत्र गाठ म्हणजे ‘ ब्रह्मगाठ’ बांधली जाते. असे हे पवित्र यज्ञोपवीत (जानवे) इथून पुढे आयुष्यभर धारण करायचे असते.
६) मौंजीबंधन : संकटांचा सामना करण्यासाठी कंबर कसून बटू तत्पर रहावा यासाठीचा उपचार म्हणजेच मौंजीबंधन विधी. मुंज नावाच्या गवताची दोरी वळून ती कमरेभोवती मेखलेप्रमाणे धारण करतात. पलाशदंड म्हणजे पळसाच्या झाडाचा दंड बटूकडे सोपविला जातो. याचा उपयोग फक्त आत्मरक्षणासाठी नाही तर आत्मशासनासाठी सुद्धा होतो. आता सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे.
७) गायत्री उपदेश व अनुप्रवचनीय होम : बुद्धीचा उदय, संवर्धन व जतन व्हावे या उद्देशाने पिता आपल्या पुत्राला गायत्री उपदेश करुन आपला वैदिक परंपरेचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवतो. गायत्री मंत्र ही ब्राह्मणांची माता आहे. तो मंत्रराज आहे. सत्-चित्-आनंद स्वरुप सृष्टीकर्त्या तेजोमय प्रकाशमान परमात्म्याच्या तेजाचे आम्ही ध्यान करतो; तो परमात्मा आमची बुद्धी व कर्म यांना सत्याकडे, सन्मार्गाकडे प्रवृत्त करत राहो अशी सदिच्छा या मंत्रात व्यक्त केलेली आहे. मुंज झालेल्या प्रत्येकाने संध्या व गायत्री उपासना जरुर करावी कारण ‘ गायन्तं त्रायते यस्मात् गायत्री त्वं ततः स्मृता’ म्हणजे ह्या मंत्राचे गायन करणाऱ्याचे रक्षण करते, ती गायत्री होय.
८) मेधाजनन :बटूची बुद्धी – मेधा- स्मरणशक्ती वाढावी यासाठी हा विधी केला जातो. केलेला अभ्यास जास्तीतजास्त लक्षात रहावा हा यामागील उद्देश आहे.
९) भिक्षावळ :बटूने पाच घरी भिक्षा मागून दुपारच्या भोजनाची व्यवस्था करावी अशी पूर्वीची व्यवस्था. भिक्षेमुळे अहंकार कमी होतो व मिळेल त्यात समाधानी रहाण्याची शिकवण भिक्षा देते. विद्यार्जनासाठी गुरुगृही निघालेल्या बटूला तहानलाडू, भूकलाडू बांधून देण्याचा उपचार म्हणजे भिक्षावळ. ‘रक्षिले पाहिजे.ॐ भवतीच्या पक्षा’ असे समर्थ रामदास स्वामी म्हणत. समाजालाही दारी आलेल्याला माधुकरी देण्याची सवय लागली पाहिजे. त्यातून आपोआपच विद्यार्थ्यांच्या विद्यार्जनाला हातभार लागत असे.
© Copyright 2017 | All Rights Reserved | Powered by COSMIC