पुराणकाळापासून गणेशभक्तांमध्ये अतिशय लोकप्रिय असणारी ही गणपतीची पूजा आहे. सत्यनारायणाप्रमाणेच अल्पावधीत इच्छित फळ देणारे हे व्रत पुष्टिपति विनायक जयंती (वैशाख पौर्णिमा), चतुर्थी तसेच मंगळवार अथवा शुक्रवारी किंवा इतर कोणत्याही शुभदिवशी करावे.
ही पूजा करताना सुरवातीला केळीचे खुंट चौरंगाला बांधून घ्यावेत. नंतर संकल्पपूर्वक गणपती पूजन, वरुण पूजन करावे. नंतर चतुर्द्वार युक्त मंडलात ४२ परिवार देवतांचे आवाहन तसेच नवग्रह, आठ दिशांचे दिक्पाल, संरक्षक देवता (गणपती, दुर्गा, क्षेत्रपाल व वास्तोष्पती) व चार दिशेच्या द्वारांवर पूर्वेला लक्ष्मी-नारायण, दक्षिणेस उमा-महेश्वर, पश्चिमेस मही-वराह व उत्तरेला रति-मदन यांची पूजा करावी. ह्या सर्व मिळून साधारण ७० आहेत. एवढ्या सुपाऱ्या मांडणे शक्य नसल्यास तांदूळाच्या पुंजक्यांवर आवाहन करावे. नंतर गणपतीच्या मूर्तीची पंचामृत स्नान , अभिषेक वगैरे करुन षोडशोपचार पूजा करावी.
नंतर गणपतीला विविध पत्री व फुले वहावीत व अंगपूजा करुन २१ दूर्वा वहाव्यात. ह्यानंतर आवरण पूजा करावी. सत्यविनायकाला गव्हाचा रवा, साखर व खवा हे पदार्थ सव्वा प्रमाणात घेऊन त्याचे तुपात तळलेल्या मोदकांचा नैवेद्य दाखवावा. तसेच इतर पक्क्वान्नांचा सुद्धा नैवेद्य दाखवावा. मुखशुद्धीसाठी पेरु, डाळिंब इ. फळे अर्पण करावीत. ह्यानंतर सत्यविनायक व्रतकथा ऐकावी. आरती, मंत्रपुष्पांजली व प्रार्थना करावी. नंतर सत्यविनायकाला उद्देशून अर्घ्यपात्रात अथवा एका वाटीत पाणी, गंध, अक्षता, फूल, पैसा व सुपारी घेऊन मंत्रपूर्वक एक अर्घ्य द्यावे. पूजा सांगणाऱ्या गुरुजींची यथाशक्ती वस्त्र, विडा-दक्षिणा देऊन पूजा करावी. यथाशक्ती ब्राह्मण, सुवासिनी तसेच मेहुण ( जोडपे ) यांना भोजन द्यावे. देवासमोर भजन, कीर्तन, गायन इत्यादि करावे. दुस-या दिवशी सकाळी व्रताची समाप्ती म्हणजेच उत्तरपूजा करावी.
या पूजेसाठी लागणा-या सर्वसाधारण साहित्याची यादी. (पूजेपूर्वी मुहुर्त व यादीबद्दल गुरुजींचा सल्ला घ्यावा)
हळद, कुंकु, गुलाल, बुक्का, अष्टगंध |
मध |
वस्त्र (ब्लाऊजपीस)१ |
चौरंग १ |
रांगोळी |
अत्तर |
सुतळी, |
पाट किंवा आसने ३ |
नारळ २ |
जानवीजोड |
केळीचे खुंट ४ |
समई , निरंजन |
सुपाऱ्या ८० |
कापूर |
केळी६, फळे ५ |
पळी भांडे, |
हळकुंडे ५ |
उदबत्ती |
हार २, सुट्टी फुले |
तांब्या (कलश) २ |
बदाम ५ |
गहू १ कि. |
बेल, दुर्वा, तुळशी |
ताम्हण २ |
खारका ५ |
तांदूळ १ कि. |
विड्याची पाने २५ |
स्टील ताटे / ट्रे २ |
तेल,तुप, |
गूळ खोबरे |
आंब्याचे डहाळे,पत्री |
वाट्या ८ |
वाती, फुलवाती |
खडीसाखर, पेढे |
तुपात तळलेले खव्याचे मोदक |
घंटा, गणपती मूर्ती |
काड्यापेटी |
सुट्टे पैसे १० नाणी |
गणपतीचा फोटो |
|
हात पुसण्यासाठी व देव पुसण्यासाठी वस्त्र किंवा नॅपकिन २ |
पंचामृत ( दही, दूध, तूप, साखर, मध ) |
© Copyright 2017 | All Rights Reserved | Powered by COSMIC