पार्श्वभूमी : हिंदू संस्कृतीमध्ये एकूण सोळा संस्कार मानलेले आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार होय. देव, अग्नी, ब्राह्मण व सर्व समाजाच्या साक्षीने वैवाहिक जीवनास सुरुवात करणे हा प्रामुख्याने या संस्कारामागील हेतू आहे. विवाह संस्कारामध्ये वधूपिता आपली मुलगी ही लक्ष्मी आहे व वर (होणारा जावई) म्हणजे साक्षात विष्णू आहे अशा उदात्त भावनेने आपली मुलगी त्याला अर्पण करतो.
ह्या संस्कारामधील काही महत्त्वाचे विधी
विवाह संकल्प : हिंदू संस्कृतीमध्ये कोणतेही कार्य संकल्पपूर्वक म्हणजे कुठे, कधी व कशासाठी (उद्दिष्ट) करत आहे हे देवासमोर नमूद करुनच केले जाते. विवाहाच्या संकल्पामध्येच धर्मप्रजोत्पादनार्थ म्हणजेच धर्माला अनुसरुन संतति उत्पन्न करण्यासाठी ह्या मुलाचा विवाह संस्कार करत आहे असा स्पष्ट उल्लेख केला जातो. तसेच हिंदू संस्कृतीमध्ये काही धार्मिक कार्ये स्त्रिया पतीच्या सहाय्याशिवाय एकट्या करु शकत नाही व काही पुरुष पत्नीशिवाय एकटे करु शकत नाहीत; म्हणजे कोणताही पुरुष स्त्रीशिवाय व स्त्री पुरुषाशिवाय पूर्ण नसतो म्ह्णून धर्माचरणेषु अधिकार सिद्धिद्वारा अर्थात धर्माचे आचरण करण्याचा संपूर्ण अधिकार प्राप्त व्हावा ह्यासाठी ह्या मुलीचा विवाह संस्कार करतो असा उल्लेख केला जातो.
गणपतीपूजन : नियोजित शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडावे ह्यासाठी गणपतीची पूजा केली जाते. त्याच्या आशिर्वादाने सर्वकाही मंगल होवो अशी प्रार्थना केली जाते.
कन्यादान : ह्या प्रसंगी वधू पिता आपली मुलगी लक्ष्मी आहे व होणारा जावई हा विष्णू आहे अशा भावनेने आपली मुलगी त्याला अर्पण करतो. त्यावेळेस ‘धर्मे च अर्थे च कामे च नातिचरामि’ म्हणजे धार्मिक कार्यांमध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये व कामविषयक गोष्टींमध्ये वधूला विश्वासात घेतल्याशिवाय वागणार नाही, कोणताही निर्णय घेणार नाही असे वचन वराकडून घेतले जाते. ह्यावेळेस नव दांपत्यांस अलंकार, संसारोपयोगी भांडी अथवा वस्तू दान म्हणून दिल्या जातात.
कंकण बंधन : वधूवरांभोवती सूताचे वेढे घेऊन ते कंकण वधू वर एकमेकांच्या हातात बांधतात. ह्या क्षणापासून वधू-वर दोघे एकमेकांशी ‘नवरा-बायको’ ह्या प्रेमळ नात्यात बांधले गेले आहेत. एकमेकांना समजून एकत्र संसार करण्याची जबाबदारी दोघांचीही आहे असा ह्या कंकण बांधण्यामागे उद्देश आहे.
सौभाग्य अलंकार परिधान करणे : मंगळसूत्र, जोडवी हे दोन अलंकार स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतिक आहेत. शंभर वर्षांपर्यंत एकत्र रहावे व सुखी संसार करावा अशा हेतूने हे अलंकार धारण केले जातात.
विवाह होम : वैदिक विवाह विधींमधील सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे विवाहहोम होय. वधूवरांची गाठ मारुन दोघांपासून उत्तम संतति प्राप्त व्हावी म्हणून प्रजापतीला उद्देशून तुपाच्या आहुती दिल्या जातात. त्यानंतर दोघांचे सहजीवन धनधान्यानी समृद्ध रहावे ह्यासाठी साळीच्या लाह्यांच्या आहुती दिल्या जातात.
सप्तपदी व फेरे :वधूवर विवाह होमाच्या उत्तरेस जाऊन तांदळाच्या सात राशींवर एकेक मंत्राने एकत्र सात पावले चालतात. ह्यावेळी जे सात मंत्र म्हटले जातात त्यांचा अर्थ पुढील प्रमाणे :-
काही ठिकाणी विशेषतः उत्तर भारतात सप्तपदी न करता अग्नीभोवती सात प्रदक्षिणा (फेरे) मारतात.
कानपिळा : वैदिक विधींमधला नसला तरी हा थोडासा गमतीचा विधी आहे. मुलीचा भाऊ नव-या मुलाचा कान पिळतो व माझ्या बहिणीला सुखात ठेव असे बजावतो व पैसे अथवा भेटवस्तू घेतल्याशिवाय कान सोडत नाही.
ऐरिणीदान (झाल) : आजपर्यंत मी माझ्या मुलीचे पालनपोषण केले, चांगले संस्कार केले. आता मी तिला तुमच्या कुटुंबाच्या स्वाधीन करतो. तुम्ही पण तिला प्रेमाने , आपल्या मुलीप्रमाणे सांभाळा अशी प्रार्थना वधूपिता करतो व जबाबदारीचे प्रतिक असणारे सोळा दिवे मुलाच्या आई वडिलांच्या स्वाधीन करतो.
मंगलाष्टके :मराठी लग्नसोहळ्यामधील हा सर्वात महत्त्वाचा विधी आहे. ह्या प्रसंगी वधू-वरांच्या मधे एक आंतरपाट (किंवा शाल) धरतात व देवतांच्या आशिर्वादपर मंगलाष्टके गायली जातात. ह्यामध्ये वधूवरांच्या वैवाहिक जीवनास शुभेच्छा व्यक्त केल्या जातात. प्रत्येक मंगलाष्टक संपल्यावर ‘शुभमंगल सावधान’ असे म्हणून उपस्थित पाहुणे मंडळी दोघांच्या डोक्यावर अक्षता टाकतात. आतापासून दोघे जण संसारात प्रवेश करणार आहेत.मराठी लग्नसोहळ्यामधील हा सर्वात महत्त्वाचा विधी आहे. ह्या प्रसंगी वधू-वरांच्या मधे एक आंतरपाट (किंवा शाल) धरतात व देवतांच्या आशिर्वादपर मंगलाष्टके गायली जातात. ह्यामध्ये वधूवरांच्या वैवाहिक जीवनास शुभेच्छा व्यक्त केल्या जातात. प्रत्येक मंगलाष्टक संपल्यावर ‘शुभमंगल सावधान’ असे म्हणून उपस्थित पाहुणे मंडळी दोघांच्या डोक्यावर अक्षता टाकतात. आतापासून दोघे जण संसारात प्रवेश करणार आहेत.
© Copyright 2017 | All Rights Reserved | Powered by COSMIC