विविध पूजा / विधी

सत्यनारायण पूजा

सध्याच्या युगात सर्वात लोकप्रिय असणारी आणि निश्चित फळ देणारी म्हणून प्रसिद्ध असणारी ही पूजा आहे. सत्यनारायण म्हणजेच विष्णूची असणारी ही पूजा ‘ज्यादिवशी मनात श्रद्धा उत्पन्न होईल त्यादिवशी करावी’ असेच स्कंद पुराणांत सांगितलेले असल्याने ही पूजा करण्यास कोणताही मुहुर्त पहाण्याची आवश्यकता नसते. परंतु एखादी शुभकामना पूर्ण व्हावी या उद्देशाने जर ही पूजा करायची झाल्यास शुभ दिवस पाहून केल्यास उत्तमच. शास्त्रानुसार सत्यनारायण पूजेसाठी पोर्णिमा, संक्रांत तसेच प्रदोष हे दिवस प्रशस्त मानलेले आहेत.

संक्रांत म्हणजे सूर्य ज्यादिवशी एका राशीमधून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तो दिवस. साधारणपणे १४,१५ किंवा १६ तारखेला संक्रांत असते. अशा प्रकारे दर महिन्याला एक संक्रांत असते. परंतु सध्या बहुतेक जणांचा फक्त जानेवारी महिन्यात येणारी ‘मकर संक्रांत’ म्हणजेच संक्रांत असा समज असतो. अशा रितीने दर महिन्याची संक्रांत तसेच दर महिन्याची पोर्णिमा यादिवशी पूजा करणारे अनेक श्रद्धावान भक्त असतात.

ही पूजा करताना सुरवातीला केळीचे खुंट चौरंगाला बांधून घ्यावेत. नंतर संकल्पपूर्वक गणपती पूजन, वरुण पूजन तसेच नवग्रह, आठ दिशांचे दिक्पाल यांची पूजा करुन सत्यनारायणाची म्हणजे विष्णू स्वरुप असणाऱ्या बाळकृष्ण , शाळिग्राम किंवा विष्णूच्या मूर्तीची पंचामृत स्नान , अभिषेक वगैरे करुन षोडशोपचार पूजा करावी. नंतर विष्णूला आवडणारी तुळशीची पाने, फुले वाहतात. काही ठिकाणी विष्णू सहस्रनाम म्हणून १००० तुळशी वाहतात. ते शक्य नसल्यास १०८ किंवा २४ नावांनी तुळशी वहाव्यात. नंतर सव्वा या प्रमाणात केलेल्या प्रसादाचा नैवेद्य दाखवितात. अधिक माहितीकरिता प्रसादाची कृती(Recipe) खाली दिलेली आहे . नंतर उपस्थित असलेले सर्वजण श्रद्धा व भक्तीयुक्त अंतःकरणाने कथा ऐकतात. नंतर महानैवेद्य दाखवून आरती केली जाते.

नंतर मंत्रपुष्पांजली व प्रार्थना करुन पूजा सांगणाऱ्या गुरुजींची यथाशक्ती विडा-दक्षिणा, वस्त्र देऊन पूजा केली जाते. यथाशक्ती ब्राह्मण, सुवासिनी तसेच मेहुण ( जोडपे ) यांना जेऊ घालावे. देवासमोर भजन, कीर्तन इत्यादि करावे. दुस-या दिवशी सकाळी व्रताची समाप्ती म्हणजेच उत्तरपूजा करावी.

ही पूजा श्रद्धा व भक्तीयुक्त अंतःकरणाने, धर्मावर निष्ठा ठेवून, मनात कोणताही संशय न बाळगता केली असता इच्छित मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते.

प्रसादाची कृती : प्रथम एका कढई किंवा पातेल्यात तूप गरम करावे. त्यात केळ्याचे काप घालून परतून घ्यावेत. नंतर त्यात निवडलेला बारीक रवा घालून चांगला गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यावा. भाजलेल्या रव्यात काजू, बेदाणे व वेलदोड्याची पूड घालावी. गरम दूध घालून हलवावे . थोडा वेळ झाकण ठेवून रवा शिजवून घ्यावा. नंतर साखर घालावी आणि झाकण ठेवून एक वाफ आल्यावर गॅस बंद करावा.

या पूजेसाठी लागणा-या सर्वसाधारण साहित्याची यादी. (पूजेपूर्वी मुहुर्त व यादीबद्दल गुरुजींचा सल्ला घ्यावा)

ह्या वस्तू तयार बॉक्समध्ये मिळतात

बाजारातून आणण्याच्या वस्तू

घरातील तयारी

हळद, कुंकु, गुलाल, बुक्का

हार २

चौरंग १

रांगोळी, अष्टगंध

सुट्टी फुले

पाट किंवा आसने ३

सुपाऱ्या ३०

बेल, दुर्वा, तुळशी

समई , निरंजन, तेल,तुप

हळकुंडे ५

विड्याची पाने २५

पळी भांडे,

बदाम ५ , खारका ५

केळीचे खुंट ४

कलश २, ताम्हण २

वाती, फुलवाती

केळी६

स्टील ताटे / ट्रे २

चौरंगावर घालण्यासाठी वस्त्र

फळे ५

वाट्या किंवा द्रोण ८

मध, अत्तर

आंब्याचे डहाळे

शंख, घंटा, बाळकृष्ण

जानवीजोड

नारळ २

सुट्टे पैसे १० नाणी

कापूर, उदबत्ती, काड्यापेटी

गहू १ कि.

पंचामृत (दही,दूध,तूप, साखर, मध)

खडीसाखर

तांदूळ १ कि.

गूळ- खोबरे

सुतळी

पेढे/ बर्फी

प्रसाद (शिरा), महानैवेद्य

सत्यनारायण फोटो

हात व देव पुसण्यासाठी वस्त्र २

सत्यनारायण पुजेची माहिती डाऊनलोड करा